आर्वी,
arvi-new-bjp-public-relations-office : सामान्यतः इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर केवळ स्वतःचाच विचार करतात. त्यांचे वैयक्तिक कार्यालय हेच पक्षाचे कार्यालय होतेे. परंतु, आ. सुमित वानखेडे यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढावे आणि पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी आष्टी, कारंजा आणि आता आर्वी येथे सर्वसामान्यांना सहज पोहोचता येईल अशा मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र कार्यालये सुरू केली आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय विभागांमध्ये येणार्या अडचणी दूर करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सदैव तत्पर राहतील. आ. वानखेडे पक्ष शिस्तीने काम करणारे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, आर्वी शहर व ग्रामीणच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, ज्येष्ठ समाजसेवक अनिल जोशी, वसंत गुल्हाने, अरुण गेडाम, छत्रपती बोके यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी आ. सुमित वानखेडे यांनी या कार्यालयाच्या रूपाने कार्यकर्त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. नागरिकांच्या दैनंदिन आणि कार्यालयीन कामकाजात येणार्या अडीअडचणींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यालयात नियमित उपलब्ध असतील. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार, प्रसार आणि त्यांची तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे कार्यालय मार्गदर्शक ठरेल, असे आ. वानखेडे म्हणाले. कार्यक्रमाला भाजपचे आर्वी शहर व आर्वी ग्रामीण पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.