‘भोंदू बाबा’ अशोक खरात ईडीच्या जाळ्यात!

कोर्टाकडून अटकेला हिरवा कंदील

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नाशिक,
ashok-kharat : नाशिकमधील चर्चित भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली असून, सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) त्याला अटक करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने दिली आहे. न्यायालयाने खरातला बुधवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पुन्हा रिमांडसाठी हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 

ashok kharat 
 
 
अशोक खरातला मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीने त्याच्या अटकेची मागणी करत मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांची माहिती न्यायालयासमोर मांडली. तपासादरम्यान खरातने भक्तांच्या नावाने तसेच इतर व्यक्तींची कागदपत्रे वापरून ६० हून अधिक बँक खाती उघडल्याचे समोर आल्याचा दावा ईडीने केला. यातील अनेक खाती सहकारी पतसंस्थांमध्ये उघडण्यात आली होती.
 
ईडीच्या तपासात या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. हवाला व्यवहारांसाठी या खात्यांचा वापर होत असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही खात्यांमध्ये विविध सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांची नावे असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
 
अशोक खरातविरोधात आधीपासूनच फसवणूक, लैंगिक शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक उकळपट्टी आणि मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप आहेत. पुण्यातील एका व्यावसायिकाकडून धार्मिक विधी आणि पूजाअर्चेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. तपास यंत्रणांच्या मते, खरातने भक्तांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात आर्थिक साम्राज्य उभे केले.