bharatiya-janata-yuva-morcha : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मधील शैक्षणिक आणि प्रशासकीय गोंधळाविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) तर्फे मंगळवारी विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे तसेच सिनेट सदस्य विष्णू चांगदे उपस्थित होते. “भारत माता की जय”च्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. कुलगुरू निवेदन स्वीकारण्यासाठी अनुपस्थित असल्याचा आरोप करत आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांच्या कुंड्यांची तोडफोड केल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले.
घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन अंबाझरी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर भाजयुमोच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेत विद्यार्थ्यांच्या वीस महत्त्वाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. कुलगुरूंनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात उन्हाळी परीक्षांदरम्यान पिण्याचे पाणी व शीतकरण व्यवस्था, वेळेत निकाल, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक करणे, विद्यार्थी मदत केंद्र स्थापन करणे, अंतर्गत गुणांतील गोंधळ दूर करणे, मुलींसाठी स्वच्छतागृह सुविधा सुधारणे, शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिकाधिक संगणकीय पद्धतीने करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांशी उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
या आंदोलनात सिनेट सदस्य विष्णू चांगदे, महामंत्री रितेश पांडे, अथर्व त्रिवेदी, नागेश साठवणे, युवती प्रमुख प्रशंसा भोयर आणि विद्यार्थी आघाडी संयोजक शंतनू झाडे सहभागी झाले होते. भाजयुमोने ४८ तासांत मागण्यांवर निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.