अनिल कांबळे
नागपूर,
crime news मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 36 वर्षीय युवकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी लाेणारा शिवारातील एका शेतातील विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत युवकाची ओळख याेगेश तुळशीराम सांभारे (36), रा. निंबाेली, पाेस्ट उपरवाही, ता. कळमेश्वर अशी करण्यात आली आहे. याेगेश हा हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत हाेता.
मिळालेल्या माहितीनुसार, याेगेश हा 11 मे 2026 राेजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाला हाेता. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शाेध घेतला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर 14 मे राेजी कळमेश्वर पाेलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. दरम्यान, 17 मे राेजी सायंकाळी 6 वाजता लाेणारा शिवारातील एका शेतातील विहिरीत याेगेशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांसह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.crime news पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून हा प्रकार अपघात, आत्महत्या की घातपात याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून सत्य समाेर आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
.........