धारणी,
cattle-smuggling : सोमवारी सकाळी धारणी तालुक्यातील बैरागड गावात धारणी पोलिस पथकाने २८ गायी पकडून गोतस्करांच्या कचाट्यातून मुक्त केल्या. ४ आरोपींना सुद्धा पकडण्यात आले असून सर्व गायी बाबंदा येथील वंदे मातरम् गोरक्षण समितीच्या सुपूर्द करण्यात आल्या. या धाडसी कारवाईमुळे गोसेवकांकडून पोलिसांचे अभिनंदन होत आहे. सर्वच आरोपी बैरागडचे आहेत.
धारणीपासून ३० कि. मी. अंतरावरील बैरागड गावातील लगतच्या एका शेतात २८ गायी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या होत्या. सर्व जनावरे धारणीला आणण्याचे तस्करांचे मनसुबे असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अधिकारी सतीश झालटे यांनी तडकाफडकी सरळ कारवाई करून ४ गोतस्करांना पकडून २८ गायींना जीवनदान दिले. आरोपीची नावे अकील मुस्लिम, मियाखाँ, शे. रहिम व शे. हकीम अशी आहे. एका मोठ्या वाहनाने सर्व गोवंश बाबंदा येथील वंदे मातरम् गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले. सदर धाडसी कारवाईत सतीश झालटे, प्रकाश गिरडकर, सतीश राठौड, जगन तेलगोटे, आदित्य सुरनर व गजानन जामनिक यांनी भाग घेतला. एकूण ५ लाख ९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून निकेतन कदम यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामीण भागातील परंपरागत गुन्ह्यांची संख्या घटलेली असून जनतेत पोलिसांची प्रतिमा सारखी वाढत आहे. विशेष असे की, कदम जेव्हा प्रोबेशनवर धारणीत होते तेव्हा पण गुन्हेगारांवर अंकुश लागलेला होता.
धारणी पोलिस ठाणे क्षेत्रातील गोवंश तस्करांवर सरळ कारवाई सुरू झाल्याने सामान्य नागरिक आणि गोसेवकांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे.
पोलिस कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून लवकरच मोठ्या कारवाईचे संकेत सुत्रांकडून मिळालेले आहे.