नागपूर,
CBI Raids in Nagpur and Chandrapur देशभरात चर्चेत असलेल्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भातील धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष पथकाने मंगळवारी नागपूर आणि चंद्रपूर येथे छापेमार कारवाई करत तीन विद्यार्थ्यांच्या घरांची झडती घेतली. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थी नागपूरमधील तर एक चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाला नागपूर येथील स्थानिक सीबीआय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप, काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि ऑनलाईन व्यवहारांची माहिती तपासण्यात आली. नीट परीक्षेदरम्यान झालेल्या संशयास्पद संपर्कांबाबत तसेच आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणांकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित हालचाली आणि संपर्कांची माहिती पडताळून पाहिली जात आहे. देशभरात सुरू असलेल्या या तपासात आता विदर्भातील कनेक्शन समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.