वाशीम,
code-of-conduct : वाशीममसह संपूर्ण जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची ठरणारी ’नांदेड — कुर्ला (व्हाया वाशीम)’ ही बहुप्रतिक्षित रेल्वे सेवा ऐन सुरू होण्याच्या काही तास आधीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ मे रोजी राज्यातील १६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद जागांचा निवडणूक कार्यक्रम अचानक जाहीर केला. यामुळे सोमवारीच आचारसंहिता लागू झाल्याने १९ मे रोजी दुपारी ४ वाजता होणारा या रेल्वेचा नियोजित उद्घाटन सोहळा ऐन वेळेवर तडकाफडकी रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे. या रेल्वे सेवेच्या वेळापत्रकानुसार, १९ मे रोजी दुपारी ठीक ४ वाजता या गाडीला नांदेड रेल्वे स्थानकावरून अधिकृतपणे हिरवी झेंडी दाखवून मुंबईकडे रवाना केले जाणार होते. नांदेडहून सुटल्यानंतर ही गाडी संध्याकाळी ७:२८ वाजता वाशीम स्थानकावर पोहोचणार होती, जिथे वाशीमवासीयांकडून तिचे जंगी स्वागत होणार होते. त्यानंतर पुढे अकोला आणि भुसावळ मार्गे ही रेल्वे मुंबई (कुर्ला) कडे धावणार होती. मात्र, १८ मे च्या रात्री लागू झालेल्या आचारसंहितेने ऐन वेळी या प्रवासावर ’रेड सिग्नल’ दाखवला.