दर्यापूर तालुक्यात काँग्रेसला हादरा

तालुकाध्यक्ष भारसाकळे यांचा राजीनामा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
दर्यापूर,
congress-daryapur : गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असलेल्या दर्यापूर तालुक्याचे काँग्रेसचे मोठे नेते सुधाकर भारसाकळे यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या दुय्यम वागणुकीमुळे काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांच्या सुपूर्द केला आहे.
 
 
J
 
 
 
दर्यापूर तालुक्यातील सहकारातील सर्व संस्था काँग्रेसच्या ताब्यात खेचून आणण्यात तथा दर्यापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदेही काँग्रेसकडे खेचून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. यासह अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, दर्यापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या, सामाजिक संघटना तथा दर्यापुरात सर्वधर्मीय लोकांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य करीत दर्यापूरमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील सामान्य नागरिकांचा मोठा पाठींबा भारसाकळे यांना आहे. यामुळे पुढील काळात काँग्रेसच्या हातातून एकमेव काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला तालुका जाण्याची श्यकता आहे.
 
 
अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या भल्याभल्यांना जे जमले नाही, ते सुधाकर भारसाकळे यांनी दर्यापूर तालुक्यात करून दाखवल्याने अमरावती जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये या व्यक्तिमत्त्वाबद्दल जळफळाट निर्माण झाला होता. सुधाकर भारसाकळे यांच्या सतत यश मिळवण्याच्या वृत्तीमुळे आपले पद धोक्यात येईल का, अशी भीती वरिष्ठांना वाटू लागल्याने जिल्हा नेत्यांनी दर्यापूर तालुका काँग्रेसमध्ये ढवळाढवळ करणे सुरू केले. यामुळे हळूहळू सुधाकर भारसाकळे यांचे महत्त्व कमी करण्यात त्यांना यश आले.
 
 
 
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर दर्यापूर नगरपालिकेत वरिष्ठांच्या आशीर्वादाने नगरसेवकांमध्ये दुफळी निर्माण करून सुधाकर भारसाकळे यांना कमजोर करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. सततच्या गटबाजी व डावलण्याच्या स्थितीमुळे सुधाकर भारसाकळे हतबल झाले. परिणामी काँग्रेस सोडण्याचा विचार पक्का करीत सोमवारी सायंकाळी सुधाकर भारसाकळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवित काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला. राजीनामा दिला असला तरी अजूनही तो स्वीकृत झाला नसल्याचे सांगण्यात येत असून वरिष्ठ स्तरावरून सुधाकर भारसाकळे यांना समजावण्याचे तथा राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून होत आहेत. मात्र आपल्या राजीनामा देण्याच्या निर्णयावर सुधाकर भारसाकळे ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.