लुधियाना,
Death of Punjabi Singer पंजाबी संगीत क्षेत्रातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध लोकगायिका इंदर कौर यांचा मृतदेह लुधियानातील एका कालव्यात सापडल्याने संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. अखेर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. इंदर कौर या स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि लोकसंगीत सादरीकरणांमध्ये सक्रिय होत्या. त्यांनी कमी कालावधीत पंजाबी लोकसंगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक मृत्यूने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, १३ मे रोजी त्या घरातून बाहेर पडल्या होत्या, त्यानंतर त्या परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा मृतदेह कालव्यात आढळला.या प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की, लग्नाला नकार दिल्यामुळे इंदर कौर यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. तसेच एकतर्फी प्रेमातून हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात इंदर कौर यांची ओळख मोगा येथील आणि सध्या कॅनडात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीशी असल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, संबंधित व्यक्तीकडून सतत लग्नासाठी दबाव टाकला जात होता आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. या प्रकरणात परदेशातून कट रचल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.