सातबार्‍यातून १.६७ हेक्टर आर शेतजमीन गायब !

- पालेवाडा येथील शेतकर्‍याचे पाणी टाकीवर चढून आंदोलन - शेतजमीन तफावत नोंदीत दुरुस्ती करण्याची मागणी

    दिनांक :19-May-2026
Total Views |
गोंदिया, 
agricultural-land-records : गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा येथील शेतकरी कृष्णकुमार डोये यांच्या शेत जमीनीचे रुपान्तरीत क्षेत्र करतेवेळी संबंधित महसूल विभागाकडून सातबारा नोंदीत १.६७ हेक्टर आर शेतजमीन कमी दाखविण्यात आली. दरम्यान, नोंद दुरुस्ती करावी व आपल्या हक्काची शेतजमीन मिळावी यासाठी डोये यांनी संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारल्या, मात्र न्याय मिळाला नाही. अखेर डोये यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी मंगळवारी १९ मे रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन केले. यावेळी त्रुटी दुरुस्त करा अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.
 
 
Untitled-1
 
या संदर्भात पिडीत शेतकरी डोये यांनी सांगितले की, पालेवाडा येथील शेतजमीनीचा जुना गट क्रमांक ३३६ नुसार डोये कुटुंबाच्या नावे १०.१४ हेक्टर आर शेतजमिनीची नोंद आहे. सन १९८९ मध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमिनीची विभागणी करण्यात आली. त्यानुसार गट क्रमांक ३३६/४ व ३३६/५ असे विभाजन करून फेरफार नोंदी करण्यात आल्या. महसूल विभागाने जुना गट क्रमांक ३३६ चे नवीन गट क्रमांक ४१७ मध्ये रूपांतरित करताना मूळ क्षेत्रफळात तफावत केली. त्यामुळे नव्या नोंदीत केवळ ८.४७ हेक्टर आर ऐवढा क्षेत्र दाखविण्यात आल्याने त्यांची १.६७ हे.आर. शेत जमीन कमी झाली. अनेक वेळा तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांकडे निवेदन, अर्ज आणि पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही दरम्यान आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागासह पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी घटनास्थळी दाखल होत शेतकर्‍याशी चर्चा केली व या प्रकरणाची चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. यानंतर डोये यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.
 
 
प्रशासनाला न्यायासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. निर्धारित मुदतीत न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल.
- कृष्णकुमार डोये, शेतकरी, पालेवाडा