नागपूरमध्ये इंधन दरांचा भडका; २४ तासांत दुसरी वाढ, नागरिक हैराण

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नागपूर,
fuel-prices-have-risen : सरकारी तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा असल्याने गत चोवीस तासात नागपुरातील पेट्रोल-डिझेलचे दोन वेळा भाव वाढले आहे. यामुळे वाहनचालकांना फटका बसला आहे. सोमवारी पेट्रोलचे दर १०७.१८ रुपये तर डिझेल ९३.६९ रुपये होते. मंगळवारी पेट्रोलचे दर १०८.९ रुपये तर डिझेल ९४.६३ रुपये झाले असून पेट्रोल ९१पैश्यांनी तर डिझेल ९४ पैश्यांनी दर वाढले आहे.

Petrol-Oil 
 
 
 
वेगवेगळया शहरात पेट्रोल वेगवेगळे दर
 
देशभरातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूकीचा खर्च आता वाढणार आहे. वेगवेगळया शहरात पेट्रोल डिझेलचे वेगवेगळे दर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबईत पेट्रोलचे दर १०६.५० रुपये आहेत, तर डिझेलसाठी नागरिकांना ९३ रुपये मोजावे लागत आहेत. हे नवे दर आजपासून लागू झाले सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे.
 
दर वाढल्याने नागरिकांमध्ये रोष
 
केवळ चोवीस तासा दोन वेळा दर वाढल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. या दरवाढीचा पटका आमच्याच खिशाला बसणार असल्याने दररोजचे बजेट विस्कळीत झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
इंधन दर वाढीमुळे महागाईत भर पडणार
 
वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईत भर पडणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव आतापर्यंत वाढले नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केले होते. तेव्हाच दरवाढीचे संकेत मिळाले होते, अशी प्रतिक्रिया काही युवकांनी व्यक्त केली.
 
नव्या दराने पेट्रोल आणि डिझेल खरेदी
 
पेट्रोलच्या दरात ९१ पैशांनी तर डिझेलच्या दर पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे आता नागपुरातील पेट्रोल पंपावर नव्या दराने पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागणार असल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांनी दिली आहे.
 
पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा
 
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसर्‍यांदा वाढ झाली असून मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे. अवघ्या चोवीस तासात दुसर्‍यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता पेट्रोलियम कंपणीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.