गोंदियात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मार्ग प्रशस्त

- आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक :19-May-2026
Total Views |
गोंदिया,
government-college-of-engineering : गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निर्मीती करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली होती. अखेर गोंदियातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारात सादर झाला असून त्याच्या मंजुरीसाठी आ. अग्रवाल यांचा पाठपुरावा सुरू आहे.
 
 
government-college-of-engineering
 
आ. अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर प्रस्ताव मुख्य अपर सचिव, तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठवला असून त्यावर पुढील मंजुरी प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी नागपूर, पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे जावे लागत होते. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अत्यंत कठीण ठरत होता. परंतु आता गोंदिया येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असल्याने हजारो विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण घेता येणार आहे. दरम्यान, प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध राहणार आहेत.
 
 
जिल्ह्यात तांत्रिक शिक्षणाचा नवा अध्याय ः आ. अग्रवाल
 
 

government-college-of-engineering 
 
अत्याधुनिक मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमुळे जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था मजबूत झाली आणि विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळाली, त्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे तांत्रिक शिक्षणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युवक आता इंजिनिअरिंग, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे भविष्य घडवू शकतील. हे महाविद्यालय केवळ एक शैक्षणिक संस्था नसून गोंदिया जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी ठरेल. आधुनिक सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे हे संस्थान आगामी काळात जिल्ह्याला नवी उंची गाठून देईल. असे मत आ. विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.