गोंदियाच्या जयस्तंभ चौक बसस्थानकाला ‘अच्चे दिन’ची प्रतीक्षा

- प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये संताप

    दिनांक :19-May-2026
Total Views |
गोंदिया, 
gondia-jayastambh-chowk-bus-stand : शहराच्या मध्यवर्ती भागातील जयस्तंभ चौक बसस्थानक आजही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. शहर विकासाच्या विविध कामांना गती मिळत असताना, या बसस्थानकाला अद्यापही ‘अच्चे दिन’ची प्रतीक्षा आहे. असे असताना या महत्त्वाच्या बसस्थानकाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
gondia-jayastambh-chowk-bus-stand
 
 
 
गोंदिया शहराचे हृदयस्थान म्हणून जयस्तंभ चौकाची ओळख आहे. असे असले तरी येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी बसण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, तसेच महिला व पुरुषांसाठी शौचालयांचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, परिसरात भटक्या जनावरांचा वावर, साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांना येथे थांबणेही कठीण झाले आहे. परिणामी महिला, पुरुष, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना उन्हात व पावसात रस्त्यावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील अनेक संघटनांकडून निवेदन, आंदोलन केले आहे. त्यात जागृती विकास मंच गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. मंच तर्फे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकार्‍यांसोबत अनेकदा सकारात्मक चर्चा करण्यात आली असून शहरातील सर्व जनप्रतिनिधींनाही याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, मंजुरी मिळून ११ महिने उलटूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
 
 
बसस्थानकाची पुणर्बांधणी करा...
 
 
येथील जागृती विकास मंचच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बसस्थानकाच्या पुणर्बांधणीची मागणी केली असून तसे निवेदनही दिले आहे. यावेळी मंचचे अध्यक्ष पंडित सुरेंद्र शर्मा, सूरज नशीने, दिव्या भगत पारधी, प्रफुल्ल जैसवाल, राजू बिसेन, नरेश गजभिये, आबिद शेख आणि प्रितीश रामटेकेर उपस्थित होते.