२० घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद

    दिनांक :19-May-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
burglar-apprehended : येथील बसस्थानक परिसरातील एका उपहारगृहाचे शटर तोडून रोख रकमेसह ऐवज चोरणार्‍यास कारंजा पोलिसांनी अवघ्या २ तासांत ताब्यात घेत अटक केली. राजा खान सलीम खान रा. बडा ताजबाग नागपूर असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे त्याने कारंजा येथील चोरीच्या गुन्ह्यासह नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि अमरावती शहर भागात आतापर्यंत केलेल्या २० घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली कारंजा पोलिसांना दिली आहे.
 
 
JLK
 
कारंजा येथील नितीन राऊत यांच्या कारंजा बस स्थानक परिसरातील उपहारगृहाचे शटर तोडून हॉटेलमधील साहित्याची नासधूस करून रोख ५ हजार रुपये चोरून नेले. राऊत यांनी कारंजा (घा.) पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाचे चक्र फिरवले. दरम्यान पोलिसांची एक चमू ठाणेदार प्रल्हाद मदन यांच्या मार्गदर्शनात चोरट्याच्या शोधात रवाना करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत राजा खान सलीम खान याला ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने घरफोडीच्या २० गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी एक दुचाकी, एक मोबाईल, रोख पाच हजार रुपये व घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात कारंजाचे ठाणेदार प्रल्हाद मदन, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश जायभाये, निलेश मंडारी, नितेश मैदपवार, दिनेश घसाड, अमोल मानमोडे, श्याम गहाट, आशिष कालोकार, मंगेश मिलके, दशरथ मेहत्रे यांनी केली.