गट-ब्रेन हेल्थ जपणे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे

-आहार, तणाव आणि भावनांचा परिणाम थेट मेंदूवर -जनजागृती मोहिमेत तज्ञांचे प्रतिपादन

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
gut-brain-health : बदलती जीवनशैली, चुकीची आहारपद्धती, वाढता तणाव, झोपेचे बिघडलेले चक्र आणि फास्टफूडच्या वाढत्या सेवनामुळे गट-ब्रेन हेल्थ अर्थात पोट आणि मेंदू यांच्यातील संबंध बिघडत आहे. त्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून निरोगी पचनसंस्था आणि संतुलित मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध असल्याने प्रत्येकाने आपल्या आहार, भावना आणि जीवनशैलीकडे गांभीर्याने पाहावे, असे मत शहरातील मेंदूरोगतज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट तरुलता श्रीरामे यांनी व्यक्त केले.
 
 
HJK
 
 
 
गट-ब्रेन हेल्थ जनजागृती उपक्रमानिमित्त मंगळवार, 19 मे रोजी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गट-ब्रेन संबंधही संकल्पना सामान्य नागरिकांना समजावून सांगितली. पोट आणि मेंदू यांच्यामध्ये सतत रासायनिक व न्यूरोलॉजिकल संदेशांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी असेल तर मानसिक स्थैर्य चांगले राहते, तर सततची चिंता, नैराश्य, भीती किंवा तणाव असल्यास त्याचा परिणाम थेट पोटावर होतो, असे ते म्हणाले.
 
 
मानवी आतड्यांमध्ये कोट्यवधी सूक्ष्म जीवाणू असतात. हे जीवाणू शरीरातील पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती तसेच मेंदूतील रासायनिक घटकांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः सेरोटोनिनसारखे न्यूरोट्रान्समिटर मानसिक आनंद, झोप आणि भावनांचे संतुलन राखण्यास मदत करतात. शरीरातील मोठ्या प्रमाणात सेरोटोनिनचे उत्पादन आतड्यांमध्येच होत असल्याचे डॉ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.
 
 
आज अनेक तरुणांमध्ये फास्टफूड, कोल्डड्रिंक्स, झोपेची अनियमितता आणि मोबाईलचे वाढते व्यसन दिसून येते. त्यामुळे पचनसंस्था बिघडते आणि त्यातून चिडचिड, चिंता, एकाग्रता कमी होणे, झोपेच्या समस्या आणि भावनिक अस्थिरता वाढते, असे मत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट तरुलता श्रीरामे यांनी व्यक्त केले.
 
 
सतत तणावाखाली राहणाèयांमध्ये अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे, भूक मंदावणे, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दिसून येतात. अनेकदा या शारीरिक लक्षणांमागे मानसिक ताण कारणीभूत असतो, असेही त्यांनी सांगितले.
 
 
फळे, भाज्या, ताक, दही, कडधान्ये, तंतुमय पदार्थ आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करावा. फास्टफूड, अतितिखट पदार्थ, जंकफूड आणि जास्त साखरयुक्त पेये टाळावीत. तसेच नियमित व्यायाम, योग, ध्यानधारणा, पुरेशी झोप आणि कुटुंबियांशी सकारात्मक संवाद ठेवणे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
पोट आणि मेंदू हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे निरोगी मनासाठी निरोगी पचनसंस्था आणि निरोगी पचनसंस्थेसाठी शांत मन आवश्यक आहे,असे प्रतिपादन तज्ज्ञांनी यावेळी केले.