आता ‘वनराज’ची राष्ट्रीय महामार्गावरून ‘स्वारी’

- मुरदोली परिसरात पुन्हा पाच वाघोबांचे दर्शन - राष्ट्रीय महामार्ग परिसरात अधिवास

    दिनांक :19-May-2026
Total Views |
गोंदिया, 
waghobas-darshan : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पांतर्गत गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील प्रवेश द्वार सुरु होताच येथील नागरिकांसह पर्यटकांना मुरदोली जंगल शिवारात एक दोन नव्हे तर चक्क पाच वाघोबांचे दर्शन झाले. त्यामुळे पर्यटकांचे पाय आपसुकच मुरदोली प्रवेश द्वाराकडे वळू लागले आहे. असे असताना आता या वाघोबांचा जंगल शिवारातून थेट राष्ट्रीय महामार्गावर मुक्त संचार दिसून आल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून राष्ट्रीय महामार्ग परिसराला लागूनच वाघाचे अधिवास असल्याचे दिसून येत आहे.
 
 
JK
 
 
 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर झोनमधूनच गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्यमहामार्ग जात असून या मार्गावरून रात्रीपर्यंत वाहनांची रेलचेल असते. दरम्यान, १७ मे रोजी रात्रीच्या वेळी या महामार्गावरून प्रवास करणार्‍या काही प्रवाशांना अचानक रस्त्याच्या मधोमध एक वाघिण व चार छावे उभे असल्याचे दिसून आले. वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेत प्रवाशांनी आपले वाहन थांबवले. यावेळी भर रस्त्यात वाघिणीसोबत तिचे छावे खेळताना आणि रस्ता ओलांडतानाचे हे दृश्य काहींनी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. महामार्गावर इतक्या जवळून वाघिणीचे दर्शन झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे तर काही काळ उत्सुकतेचे वातावरण होते. वाघीण आपल्या बछड्यांना सोबत घेऊन सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या मार्गाने ये-जा करणार्‍यांनी सावधतेने प्रवास करावा व वन्यजीवांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.