नाशिकची तहान, घसा सुकला कोरडा; येवला-इगतपुरीत टँकरसाठीच ओरडा!

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नाशिक,
water-supply-via-tankers : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदाच्या तीव्र उन्हामुळे पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोत आटत चालल्याने अनेक गावांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून सध्या विविध गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
 
 
water-supply-via-tankers
 
 
 
विशेषतः येवला, इगतपुरी आणि मालेगाव तालुक्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू असून अनेक गावे आणि वाड्यांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इगतपुरी तालुक्यातही पाण्याची कमतरता तीव्र असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी खासगी टँकरची मदत घेतली असून काही ठिकाणी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. दररोज शेकडो फेऱ्यांद्वारे हजारो नागरिकांची तहान भागवली जात आहे. मात्र वाढते तापमान आणि घटणारी भूजल पातळी यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी ग्रामीण भागातील स्थानिक जलस्रोत कोरडे पडल्याने संकट अधिक गडद झाले आहे. महिलांना पाण्यासाठी लांब पल्ल्याची पायपीट करावी लागत असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.