वाशीम,
national-dengue-day : राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त वाशिम शहरात श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सच्या पुढाकारातून पोस्टर स्पर्धा व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी डेंग्यू प्रतिबंधाबाबत प्रभावी संदेश देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.

१६ मे रोजी सकाळी ७ वाजता श्री बाकलीवाल विद्यालय, वाशीम येथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पराग राठोड, प्रसार व विस्तार माध्यम अधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातील सुनील खडसे व नितीन व्यवहारे यांची उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे निरीक्षण करून डेंग्यू प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या पोस्टर स्पर्धेचे आयोजन एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी केले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यामध्ये गौरी कानकटाव हिने प्रथम क्रमांक, सेजल सरनाईक हिने द्वितीय क्रमांक, तर अनुजा काकडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली बाकलीवाल विद्यालयापासून सुरू होऊन देवपेठ, महात्मा फुले चौक, काटीवेश, बालू चौक, शिवाजी चौक या मार्गाने पुन्हा विद्यालयात येऊन संपन्न झाली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी व पोस्टर्सच्या माध्यमातून डेंग्यूविषयी जनजागृती केली. या उपक्रमातील सर्व सहभागी कॅडेट्सचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल,मुख्याध्यापक बनराव बिल्लारी,उपमुख्याध्यापक दंभीवाल सर,पर्यवेक्षक किशोर राठोड तसेच एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे शहरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकीचा संदेश अधोरेखित झाला.