तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
overloaded-sand-transport-invites-accidents : पांढरकवडा-यवतमाळ या वर्दळीच्या मार्गावर ओव्हरलोड रेती वाहतूक करणाèया ट्रॅक्टरमुळे गंभीर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. रेतीने भरलेले ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन जात असल्याने रस्त्यावरील ब्रेकरवर वाहन उसळते आणि मोठ्या प्रमाणात रेती रस्त्यावर सांडत आहे. या सांडलेल्या रेतीमुळे दुचाकी वाहनांचे टायर घसरून अपघातात अनेक वाहनचालक जखमी होत आहेत.
विशेष म्हणजे, या मार्गावर ठिकठिकाणी गतीरोधक (स्पीड ब्रेकर) असून जवळपास प्रत्येक गतीरोधक परिसरात रेतीचा थर साचला आहे. रेतीमुळे गतीरोधक स्पष्ट दिसत नसल्याने दुचाकीस्वार तोल जाऊन अपघातास बळी पडत आहेत. पांढरकवडायवतमाळ हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या रस्त्याने दररोज कर्मचारी, कामगार, विद्यार्थी तसेच नागरिक विविध कामानिमित्त प्रवास करतात.
वाहतूक नियमांनुसार कोणत्याही मालवाहू वाहनाला निश्चित क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेण्यास मनाई आहे. भारतीय मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 113 व 114 नुसार ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
वाहनातून माल सांडणार नाही याची जबाबदारी वाहनचालक व मालकाची असते. सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण करणाèया वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक विभागाला आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी उन्हाळ्यात या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र सतत सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे वर्षभराच्या आतच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून गतीरोधक परिसर धोकादायक बनला आहे.
या पार्श्वभूमीवर ओव्हरलोड रेती वाहतूक करणाèया वाहनांवर तातडीने प्रतिबंध घालावा, नियमित तपासणी मोहीम राबवावी तसेच रस्त्यावर सांडणारी रेती त्वरित साफ करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील गावकरी व वाहनचालकांकडून होत आहे.