नवी दिल्ली,
Pakistan's Rajouri-Mamun Airbase भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या दाव्यांवर पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्यांनंतर समोर आलेल्या वास्तवामुळे पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनियान-उल-मरसूस’ अंतर्गत भारतातील विविध ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. यामध्ये राजौरी आणि मामून एअरबेस उद्ध्वस्त केल्याचेही सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात या नावांचे कोणतेही कार्यरत भारतीय हवाई तळ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजौरी हे जम्मू आणि काश्मीरमधील एका जिल्ह्याचे नाव असून तेथे कोणताही हवाई तळ कार्यरत नाही. तर मामून हे पंजाबमधील पठाणकोटजवळील लष्करी छावणीचे क्षेत्र आहे, परंतु ते हवाई तळ नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या दाव्यांवर मोठा संशय निर्माण झाला आहे.दरम्यान, पाकिस्तानी लष्करातील कॅप्टन मुनीब जमाल यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामध्ये त्यांनी भारतीय लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. या विधानानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. भारताने यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचे दावे वास्तवाशी जुळत नाहीत. अनेक ठिकाणी सापडलेला क्षेपणास्त्रांचा अवशेष ग्रामीण भागात पडलेला होता, लष्करी तळांवर नव्हता, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सोशल मीडियावर या घटनेवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.