तभा वृत्तसेवा
वणी,
police-raid-on-matka-gambling : शहरातील दीपक चौपाटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वरळी मटका जुगारावर वणी पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रकमेसह जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिस सूत्रांनुसार, अविनाश वामन चिकराम यांच्या तक्रारीवरून आरोपी अब्दुल शब्बीर अब्दुल रहेमान (वय 57, मोमीनपुरा, वणी) व अशीदखान अजहर उल्लाखान (वय 37, गुरुनगर, वणी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) तसेच बीएनएस कलम 49 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सोमवार, 18 मे रोजी दुपारी 3 च्या सुमारास दीपक चौपाटी नगर, नगर परिषद कॉम्प्लेक्सजवळ सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी अब्दुल शब्बीर हा नागरिकांकडून पैसे घेऊन वरळी मटक्याचे आकडे लिहिताना आढळून आला.
पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून मटका आकडे लिहिलेले पट्टीबुक, कार्बनचा तुकडा, पेन तसेच खिशातील 2 हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीदरम्यान आरोपी अब्दुल शब्बीर याने या मटका व्यवसायाचा मालक आरोपी अशीद खान असल्याचे सांगितले. आपण त्याच्याकडे रोजंदारीवर काम करत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारोती पाटील करीत आहेत.