गोंदिया,
oppose-buffer-zone : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट असलेल्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील ग्रामस्थांनी, बफर झोनला विरोध करत गावाचा वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत समावेश करून नये अशी मागणी केली आहे. पिंडकेपार ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सोमवार, १८ मे रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी संबंधित विभागाने ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही गावकर्यांनी केला आहे.

पिंडकेपार ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवार, १८ मे रोजी विविध विषयांवर ग्रामसभेचे आयोजन केले होते. गावातील मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित होते. सभेत बफर झोनच्या मुद्द्यावर चर्चा झाली. वन्यजीव विभागाचे वनरक्षक रणजित पाटले हे देखील उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना बफर झोनसंबंधी सविस्तर प्रशासकीय माहिती दिली. बफर झोनमुळे ग्रामस्थांना होणारे फायदेही त्यांनी समजावून सांगितले. मात्र, गावकर्यांनी बफर झोनला स्पष्ट विरोध करत पिंडकेपारचा त्यात समावेश करू नये अशी मागणी केली. गावकर्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता या गावाचा बफर झोनमध्ये समावेश का करण्यात आला. परंतु, दुसरीकडे वन विभागातर्फे दिलेल्या माहितीनुसार बफर झोन प्रक्रियेंतर्गत सन २०१६-१७ मध्येच पिंडकेपार गावाचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, ग्रामसभेत सरपंच योगिता सहारे, उपसरपंच भरत घसले, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकिशोर पाटले, सुनील सोनवणे, रेखा रहांगडाले, कांचना सहारे, रूपा लटये, कला चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी सहारे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील स्त्री-पुरुष, बचत गटातील महिला आणि अधिकारी उपस्थित होते.