अमरावती,
robbed-at-knifepoint : पेट्रोल पंपावर संकलीत झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघा लुटारूंनी बँकेसमोर मारहाण करून चाकूचा धाक दाखवत लुटले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञात लूटारुंचा शोध सुरू केला आहे.
अक्षय मोरे असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. अक्षय मोरे मंगळवारी नागपूर महामार्गावरील दोन पेट्रोल पंपांवर जमा होणारी रोकड बँकेत भरण्यासाठी बिझीलॅन्डमधील एसबीआयमध्ये गेले होते. दोन्ही पेट्रोल पंपांवरून ३ लाख १४ हजार रुपये घेतले आणि दुचाकीने बँकेत पोहोचले. त्यांनी दुचाकी बँकेसमोर उभी केली. पिशवी घेऊन बँकेच्या पायर्या चढत असताना एका लुटारूने अक्षय यांना धक्का दिला, तर दुसर्याने त्यांची दुचाकी हलवली. त्यामुळे अक्षय खाली पडले. त्याचवेळी दोघांनी त्यांना मारहाण सुरू केली व चाकूचा धाक दाखवला. त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावून घेतली.
दरम्यान, तिसरा लुटारू इलेक्ट्रिक दुचाकीसह काही अंतरावर उभा होता. दोघांनी अक्षय यांच्याकडून पिशवी हिसकावून घेतल्यानंतर तिघेही इलेक्ट्रिक दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून माहिती संकलित केली. लूटमारीच्यावेळी लुटारूंनी अक्षय मोरे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या दिशेने वार करण्याचाही प्रयत्न केला. या झटापटीत त्यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञात तिघांविरुध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.