नागपूर,
Sanskar Varga संस्कार वर्ग हा केवळ मुलांसाठी नसून संपूर्ण समाजासाठी परिवर्तनाचा मार्ग आहे, हे पुन्हा एकदा वसंतराव नाईक वस्ती येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमातून अधोरेखित झाले. संघाच्या लोक कल्याण समितीच्या माध्यमातून खरेनगर व्यावसायिक प्रभात शाखेने येथे १५ दिवसांचा संस्कार वर्ग यशस्वीपणे आयोजित केला.
या उपक्रमात ३ ते १५ वयोगटातील तब्बल ९२ मुले आणि मुली सहभागी झाले होते. या वर्गांमध्ये मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता भारतीय संस्कृती, शिस्त आणि नैतिक मूल्यांची ओळख करून देण्यात आली. Sanskar Varga दररोज प्रातःस्मरण, प्रार्थना आणि श्लोक पठणाने वर्गाची सुरुवात होत असे. प्राणायाम, ओंकार जप तसेच योगासने आणि सूर्यनमस्कार यांचा नियमित सराव घेण्यात आला. यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर भर देण्यात आला.
मुलांमध्ये आदर, शिस्त, मोठ्यांचा सन्मान आणि परस्पर सहकार्य यांसारखी मूल्ये रुजविण्यावर विशेष लक्ष देण्यात आले. तसेच दैनंदिन स्वच्छता, आरोग्यविषयक सवयी, पाणी बचत आणि परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. देशभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी वंदे मातरम्, गीतेतील श्लोक तसेच देशभक्तीपर गोष्टींचे वाचन करण्यात आले. Sanskar Varga वयोगटानुसार मुलांचे गट करून खो-खो, कबड्डी, लंगडी आणि फुटबॉल यांसारखे खेळही घेण्यात आले. उपक्रमाचा एक भाग म्हणून मुलांना महाराजबाग येथे सहलीस नेण्यात आले. तेथे विविध प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने मुलांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला.
याशिवाय वस्तीमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी मुलांनी भगवे ध्वज हातात घेऊन देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. समारोप सत्रात मुलांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा परिचय करून देण्यात आला. दंड आणि नियुद्ध यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. Sanskar Varga यामुळे मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून त्यांनी पुढील प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. या १५ दिवसांच्या उपक्रमामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला असून भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यास या संस्कार वर्गाचा मोलाचा वाटा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सौजन्य: महेश मोलकर, संपर्क मित्र