सिरोंचा,
sironcha-police-administration : आगामी मान्सून हंगामाच्या पृष्ठभूमीवर संभाव्य पूरस्थिती, मुसळधार पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सिरोंचा पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रभारी अधिकारी नांदे, पोलिस अंमलदार तसेच आपदा मित्र किरण वेमूला यांच्या सहभागातून आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
मान्सूनदरम्यान गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे रस्ते बंद होणे, झाडे कोसळणे, पूल व नाल्यांवर पाणी येणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटनांना तोंड देण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक साधनसामग्रीची तपासणी सुरू केली आहे.
सिरोंचा पोलिस ठाण्याच्या वतीने आपत्कालीन बचाव साहित्य, वायरलेस यंत्रणा, लाईफ जॅकेट, बोट व्यवस्था तसेच इतर सुरक्षा उपकरणांची पाहणी करण्यात आली. आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पथकांची तयारी ठेवण्यात आली असून सतत संपर्क व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
यासोबतच महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्राम प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्यासोबत समन्वय साधून संयुक्त कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पूरप्रवण भागांतील नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. विशेषतः नदी-नाल्यांजवळ जाणे, पूरग्रस्त मार्गांचा वापर करणे किंवा धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
मान्सून काळात नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सिरोंचा पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.