तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
scholarship-exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारीत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळांच्या 4,797 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे मिळून एकूण 21,678 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल 4 हजार 797 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यामध्ये पाचवीच्या 4125 आणि आठवीच्या 672 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मागील वर्षी पाचवी व आठवीचे मिळून केवळ 779 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले होते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी राज्यात यवतमाळ जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत 28 व्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यावर्षी तब्बल 4797 विद्यार्थी बाजी मारून परीक्षेत पात्र ठरले आहेत तथा उच्चांक गाठून राज्यात 16 वे स्थान प्राप्त केले आहे.
2025-2026 या शैक्षणिक वर्षात जिल्हाधिकारी विकास मीना व जिप मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात जिपच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करता यावे व त्यांची शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी ‘मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स’ हा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यातील 16 तालुक्यांत प्रभावीपणे राबविण्यात आला होता.
सोबतच शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार, जिल्हा समन्वयक तथा गटशिक्षणाधिकारी राजू मडावी यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील शिक्षकांनी अतिरिक्त तास, विशेष मार्गदर्शन, नेहमीत सराव चाचण्या घेतल्या होत्या.