‘सगुणा’ भात शेती तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक

(शिकारीटोला येथील शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

    दिनांक :19-May-2026
Total Views |
कोरची, 
saguna-rice-farming-technology : तालुका कृषी विभाग कोरची यांच्या वतीने शिकारीटोला येथे ‘सगुणा भात लागवड तंत्रज्ञान’ या नाविन्यपूर्ण पद्धतीचे प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. पारंपरिक भात शेतीला फाटा देत कमी खर्चात आणि कमी कष्टांत अधिक उत्पन्न देणार्‍या या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती.
 
 
JK
 
 
 
तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दुर्गम भागातील शेतकर्‍यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहोचवणे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा होता.
 
 
प्रात्यक्षिकादरम्यान तालुका कृषी अधिकार्‍यांनी उपस्थित शेतकर्‍यांना सगुणा तंत्रज्ञानाचे सविस्तर महत्त्व पटवून दिले. नांगरणी व चिखलणीची गरज नाही. नेहमीप्रमाणे शेताची चिखलणी न करता कायमस्वरूपी गादीवाफे तयार करून त्यावर टोकण पद्धतीने भाताची लागवड केली जाते. या पद्धतीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पाण्याची 50 टक्क्यांपर्यंत बचत होते. पिकाची मुळे खोलवर जात असल्याने झाड मजबूत होते आणि रोगांना कमी बळी पडते, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
 
 
 
सगुणा भात लागवड तंत्रज्ञान हे काळाची गरज असून यामुळे शेतकर्‍यांचा मशागत खर्च, डिझेल, मजुरी आणि वेळेचा खर्च 30 ते 40 टक्क्यांहून अधिक कमी होतो. शिकारीटोला तसेच कोरची तालुक्यातील शेतकर्‍यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून आपले उत्पन्न दुप्पट करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी केले आहे.
 
 
यावेळी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतात गादीवाफे कसे तयार करावेत, टोकण यंत्राचा वापर कसा करावा आणि आंतरमशागत कशी करावी, याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. शिकारीटोला आणि परिसरातील गावांमधून आलेल्या पुरुष व महिला शेतकर्‍यांनी अत्यंत उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभाग घेतला आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
 
 
यावेळी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी मसराम, गुण नियंत्रण अधिकारी पाथोडे, टेंभुर्णे, कृषी सेवक डोंगरवार सरपंच, प्रगतशील शेतकरी आणि शिकारीटोला येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विभागाच्या या पुढाकाराबद्दल स्थानिक शेतकर्‍यांनी आभार मानले असून, यंदाच्या हंगामात या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा संकल्प केला आहे.