विधान परिषदेची निवडणूक ठरणार ‘प्रतिष्ठेची’

युतीचे पारडे जड : रिक्त जागांमुळे बदलले गणित

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
legislative-council-election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, ही निवडणूक सर्वच पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. युतीकडे 250 मतांचे बळ आहे तर आघाडीकडे 150 सदस्य आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असून, अपक्ष व मित्रपक्ष या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत.
 
 
JKL
 
 
 
या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे 483 मतदार पात्र आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या 62 जागा आणि पंचायत समिती सभापतींची 16 पदे रिक्त असल्याने प्रत्यक्षात 405 सदस्य मतदान करणार आहेत.
 
 
या संख्याबळात महायुतीचे पारडे सध्या तरी जड आहे. महायुतीकडे जवळपास 250 मतदारांचे समर्थन असल्याची चर्चा असून, महाविकास आघाडीकडेही 150 पेक्षा अधिक सदस्य असले आणि शंभराचा फरक असला तरी ही लढत सोपी राहणार नाही.
 
 
महायुतीचे पारडे जड असले तरी अंतिम क्षणी ‘मित्रपक्ष’ आणि ‘अपक्ष’ सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अनेक सदस्य सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. तर अनेक इच्छुकांनी आतापासून पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.
असा आहे, निवडणूक कार्यक्रम
 
 
सोमवार, 1 जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. मंगळवार, 2 जून रोजी छाननी करण्यात येणार आहे. गुरुवार, 4 जूनपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. गुरुवार, 18 जूनला मतदान होणार आहे. सोमवार, 22 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
पक्ष - सदस्य संख्या
 
भाजपा - 108
शिवसेना - 93
राकाँ अ. पवार - 25
काँग्रेस - 98
उबाठा शिवसेना - 28
राकाँ श. पवार - 04
अपक्ष - 22
वंचित - 06
मनसे - 03
स्थानिक आघाडी - 21