नीट पेपर लिकचा मास्टरमाईंडचे ‘नागपूर कनेक्शन’

सीबीआयचे नागपुरातील दाेन विद्यार्थ्यांच्या घरावर छापे

    दिनांक :19-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
neet paper leak mastermind संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या नीट पेपरफुट प्रकरणात नवे वळण आले आहे. नीट पेपरफुट प्रकरणाच्या तपासात आता नागपूर कनेक्शन समाेर आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने नागपूर सीबीआय पथकाच्या मदतीने मंगळवारी सकाळी नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन उमेदवारांच्या घरांवर छापे घातले. सीबीआयच्या छाप्यांमुळे आता नीट पेपरफुटीत नागपुरात नेमके काय घडले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 

neet paper leak mastermind 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, झडती घेण्यात आलेल्या तिघांपैकी दाेन विद्यार्थी नागपूरमधील असून एक उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. सीबीआयच्या पथकांनी या विद्यार्थ्यांच्या घरांची व माेबाईलची तपासणी केली. या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेदरम्यान काही संशयास्पद संपर्क, आर्थिक व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल पुरावे तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
कारवाईदरम्यान माेबाईल फोन, लॅपटाॅप, ऑनलाइन ट्रान्झेंक्शन रेकाॅर्ड, चॅट हिस्ट्री आणि अनेक डिजिटल पुरावे तपासण्यात आले. काही महत्त्वाची इलेक्ट्राॅनिक उपकरणे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समाेर आली आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर काही विद्यार्थ्यांच्या संपर्कात असलेल्या लाेकांवर आहे. पेपरुट रॅकेट, काेचिंग लाॅबी, दलाल नेटवर्कशी त्यांचे संबंध हाेते का, याचा कसून तपास सुरू आहे. नागपुरातून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांमुळे तपासाला माेठी दिशा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेपूर्वी झालेल्या काही संशयास्पद चॅट्स, पैशांचे व्यवहारामुळे सीबीआयचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे नागपुरातून जप्त करण्यात आलेले डिजिटल पुरावे दिल्लीला पाठवण्यात आले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात माेठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.neet paper leak mastermind दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह जवळच्या व्यक्तींचीही चाैकशी करण्यात आली. अद्याप काेणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी तपासाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. अद्यापपर्यंत सीबीआयने विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली नसून या प्रकरणी सीबीआयने काेणतीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही.