लोणी ते आरंभी रस्त्याला मुहूर्त कधी..?

-भूमिपूजनाला दोन महिने उलटले तरी काम नाही -परिसरातील नागरिकांचा जीव मेटाकुटीला

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
the-road-from-loni-to-arambhi : लोणी ते आरंभी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, रस्त्याचे काम अजूनही झाले नसल्याने, परिसरातील नागरिकांचा या रस्त्यावरून चालताना जीव मेटाकुटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र दोन महिने उलटूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने, या रस्त्याला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
 
y19May-Muhurta
 
 
 
आर्णी मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लोणी ते आरंभी या रस्त्याचे काम मागील 30 वर्षांपासून झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर चालताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाला उपचारासाठी नेताना वाटेतच त्याचा मृत्यू होईल अशी विदारक परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. मात्र या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.
 
 
या रस्त्याने दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिक प्रवास करतात, मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. असे असताना काही दिवसा अगोदर आ. राजू तोडसाम यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले होते.
 
 
मात्र दोन महिने उलटूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने, भूमिपूजन करून काय देखावाच केला का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तरी प्रशासनाने तत्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
 
थोड्या दिवसांत तुटलेल्या पुलामुळे संपर्क तुटणार...
 
 
लोणी ते आरंभी हा दिग्रस, दारव्हा व आर्णी या तीन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे. या पुलाला पडलेल्या भगदाडामुळे रात्रीच्या अंधारात भगदाड दिसत नसल्याने, अपघात होत आहेत. मात्र लवकरच हा पूल पूर्णपणे जीर्ण होणार असून, या रस्त्यावरून प्रवास करणाèया नागरिकांचा संपर्क तुटणार आहे.
 
 
लोणी ते आरंभी हा रस्ता एकूण 12 किमी लांबीचा असून, त्याच्या सुधारणेसाठी 48 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. मात्र या निधीतून आरंभी ते लोणी या रस्त्यातील फक्त 800 मिटर रस्त्याचीच सुधारणा होणार आहे. उर्वरित निधीतून दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी, वागद, सावळा व मोझर या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे. गेल्या 30 वर्षांत इतर रस्ते अनेकवेळा कामे करूनही निकामी झाले असून, पण आरंभी ते लोणी या रस्त्याचे काम 30 वर्षांत झालेलेच नाही. त्यामुळे यामागे लोकप्रतिनिधींचे अपयश दडले आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.