गोरेगाव,
truck-collision : गोरेगाव - ठाणा जिल्हा मार्गावर असलेल्या नोनीटोला(सोनी) फाट्यावर मंगळवारी १९ मे रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अनील शालीकराम हरिणखेडे (३०) रा. नोनीटोला, ता.गोरेगाव असे मृताचे नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळावर धाव घेत संतप्त गावकर्यांनी मृताच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मातेश्वरी राईस इंडस्ट्रीज देवरी येथील ट्रक क्रमांक एम.एच.३५ ए.जे.४९७० ठाणाकडून गोरेगावच्या दिशेने येत असताना ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून नोनीटोलाकडून मुख्य रस्त्यावर येत असलेल्या अनीलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने अनीलचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाचाही स्टेयरिंग वरुन नियंत्रण सुटल्याने ट्रक विजेचा खांबाला तोडुन रस्त्याच्या शेजारील नालीत ट्रकचे चाक फसले. या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी आक्रमक भूमिका घेत गोरेगाव ते ठाणा मार्गावर ठिय्या आंदोलनास सुरुवात करत मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी रेटून धरली व मृतदेह उचलू देणार नाही, असा ठाम इशारा प्रशासनाला दिला. त्यामुळे काही काळासाठी गोरेगाव ते ठाणा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. आंदोलक ग्रामस्थ व पोलिस प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहीती समोर येत आहे.