वर्धा,
truck-transporting-mangoes-overturns : नागपूरकडे आंबे घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना मध्यरात्री जाम-नागपूर मार्गावरील बरबडी जवळ घडली. यात ट्रक आणि आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक साईनाथ रामकिसन (२५) रा. आदिलाबाद हा लिनर शेख करीम (५८) आणि शेख शफीक (२८) दोघेही रा. जैनूर तेलंगणा यांच्यासह टी. जी. ०१ टी. २२५० क्रमांकाच्या ट्रकने आंबे घेऊन आदिलाबादहून नागपूरकडे जात असताना ट्रक जाम-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बरबडीजवळ आला असता चालकास झोपेची डुलकी आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकास धडक देत उलटला. या अपघातात ट्रक आणि आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी शेख करीम आणि शेख शफीक या जखमींना ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथे हलविले. प्रमोद धोटे यांच्या नेतृत्वातील पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.