तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
uday-navlekar : प्रसिद्ध साहित्यप्रेमी व वक्ते डॉ. उदय नावलेकर निर्मित ‘गुलजार : भावनांच्या पलीकडे’ हा विशेष कार्यक्रम यवतमाळ येथील एलिमेंट्स थिएटरमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमात ज्येष्ठ कवी, गीतकार आणि लेखक गुलजार यांच्या साहित्य, कविता आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाचा सखोल वेध घेण्यात आला. डॉ. नावलेकर यांनी आपल्या प्रभावी शैलीतून गुलजार यांचे व्यक्तिमत्त्व आणि लेखनातील भावविश्व, जीवनदृष्टी आणि संवेदनशीलता श्रोत्यांसमोर 1 तास 20 मिनिटांत उलगडली. या कार्यक्रमासाठी माहिती संकलन आणि सूक्ष्म तपशील तयार करण्यासाठी डॉ. नावलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. व्हिडिओ एडिटिंगसाठी डॉ. आदित्य नवग्रहे यांनी मोलाची मदत केली.
या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वांनी यवतमाळकराच्या या निर्मितीचा मनापासून आस्वाद घेतला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे साहित्याची गोडी वाढते, असे मत व्यक्त केले.
अशा दर्जेदार साहित्यिक निर्मितीमुळे गुलजार यांचे व्यक्तिमत्व अधिक सखोलपणे समजून घेता आले असून अशा कार्यक्रमांमुळे यवतमाळमध्ये सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होत असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.