ऋषिकेश,
Ujjain Express coaches derailed उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे सोमवारी रात्री मोठा रेल्वे अपघात घडला. ऋषिकेश रेल्वे स्थानकाजवळील खांड गाव परिसरात उज्जैन एक्सप्रेसचे तीन डबे अचानक रुळावरून घसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, नियमित देखभालीच्या कामादरम्यान ट्रेनच्या ब्रेक प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर रिकामा करण्यात आला.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात घडल्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. रेल्वे विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत देशात रेल्वे अपघात आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर एका प्रवासी ट्रेनला आग लागल्याची घटना घडली होती. त्याआधी रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली होती. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.