अमरावती,
university-staff-protests : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कर्मचार्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचे आज तीव्र पडसाद उमटले. आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, विद्यापीठ प्रशासकीय कर्मचार्यांच्या एकजुटीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. दरम्यान, या आंदोलनाची गंभीर दखल घेत शासनाने चर्चेचे सकारात्मक संकेत दिले असून, संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख हे तातडीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांसोबतच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आजच्या या आंदोलनाला ‘नुटा’ व ‘एमफुक्टो’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही विद्यापीठातील शेकडो अधिकारी आणि कर्मचार्यांनी निषेध सभेत हजेरी लावली. गगनभेदी घोषणांनी विद्यापीठ परिसर दिवसभर गाजत होता. निषेध सभेला अधिकारी फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश वरखेडे तसेच कर्मचारी संघाचे महासचिव नरेंद्र घाटोळ यांनी संबोधित करून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. सर्वच वक्त्यांनी सरकारच्या उदासीन धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ही वेळ आमच्यावर शासनाच्या नाकर्तेपणामुळे आली आहे. आम्ही कोणतीही अवाजवी मागणी केलेली नाही. इतर राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच आम्हालाही लाभ मिळावेत, हीच आमची रास्त मागणी आहे असे मत व्यक्त केले. बुधवारी मुंबईत होणार्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीत शासन काय भूमिका घेते, यावर या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होईल असे त्यांनी सांगितले.