धारणी,
unusual-death-of-a-leopard : धुळघाट वन परिक्षेत्रात वाघाचे दर्शन घेण्याची चर्चा रंगत असतानाच सोमवारी राणीगाव गावालगतच्या सरपंचाच्या चंदनाच्या बागेत तरुण बिबट्याचा मृतदेह दिसल्याने एकच खळबळ माजलेली होती.
शवविच्छेदन झालेले असून फॉरेन्सीक अहवाल येण्याआधीच चर्चेला उत आलेले आहे. काही ग्रामस्थांनी याच ठिकाणी बिबट्याला जिवंत पाहिलेले असल्याने मृत्युचे रहस्य गडद झालेले आहे. सोमवारी भल्या पहाटेच चंदनाच्या शेतातील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबट्याने तार कुंपन असलेल्या चंदनच्या शेतात प्रवेश केल्याचे प्रथमदर्शनी समजलेले असून शिकारानंतर बाहेर निघताना बिबट भटकलेला असावा. बाहेर जाण्याच्या नादात त्याला भरपूर प्रयत्न केल्याने थकवा येण्याची शक्यता आहे. रेंजर एस. डी. चक्रे, वर्तुळ अधिकारी एम. एस. शाकीर आणि सारिका जावरकर सह वनकर्मचार्यांनी पंचनामा करुन मोक्यावरील पुरावे संकलीत केले. शवविच्छेदन सुद्धा मोक्यावरच करुन दाहसंस्कार करण्यात आले.
घटनेचा संपूर्ण अहवाल डी. एफ. ओ. व सहाय्यक वन संरक्षक कार्यालयास पाठविण्यात आलेला आहे. प्राप्त माहितीप्रमाणे राणीगावचे सरपंच लक्ष्मण भिलावेकर यांचे शेत गाव तलावाजवळच आहे. तलावात पाणी पिण्यासाठी बिबट आला असावा अशी शक्यता आहे. पाळीव कुत्र्याला शिकार केल्यावर बिबट मेल्याने रहस्य वाढलेले आहे. मात्र जिवंत अवस्थेत अनेकांनी बिबट्याला घाबरलेल्या स्थितीत पाहिल्याने मृत्युचे नेमके कारण गुलदस्त्यात गेलेले आहे. सुक्ष्म अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे कारण समजेल असे मत अधिकार्यांनी व्यक्त केले आहे. एका माहितीनुसार, मृत बिबट हा तरुण होता, वयोवृद्ध नव्हे. चपळ, चलाख बिबट्याच्या मृत्युचे गुढ न उलगडण्यासारखे असले तरी धुळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांचे जिवन संकटात येत असल्याचे दिसत आहे. बारुखेडा-धुळघाट मार्गावर पण अनेकांनी पट्टेदार वाघाला पाहिलेले आहे.