वॉशिंग्टन/नवी दिल्ली
US Waiver on Russian Oil Extended रशियन तेलावरील निर्बंधांबाबत अमेरिकेने महत्त्वाचा निर्णय घेत भारतासह अनेक देशांना दिलासा दिला आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने सागरी मार्गाने वाहतूक होणाऱ्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेली सूट आणखी एका महिन्यासाठी वाढवून ती १७ जून २०२६ पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, यापूर्वी लागू असलेला जनरल लायसन्स १३४बी रद्द करून त्याऐवजी नवीन जनरल लायसन्स १३४सी लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे १७ एप्रिलपूर्वी समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या व्यवहारांना तात्पुरती मुभा कायम राहणार आहे.

यापूर्वीही अमेरिकेने मार्च आणि एप्रिल महिन्यात अशाच प्रकारची मुदतवाढ दिली होती. भारतासह अनेक देशांना रशियन तेल खरेदीसाठी ही सूट देण्यात आली होती. मात्र, नव्या आदेशात इराण, उत्तर कोरिया, क्युबा किंवा युक्रेनच्या काही भागांशी संबंधित व्यवहारांना परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे. सरकारने सांगितले की, भारताचा तेल खरेदीचा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक गरजा आणि ऊर्जा सुरक्षेवर आधारित आहे. कोणत्याही बाह्य दबावाचा त्यावर परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
पेट्रोलियम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताची रशियन तेल खरेदी अमेरिकेच्या सवलतींवर अवलंबून नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची उपलब्धता कायम असून भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत व्यापार थांबवण्यासाठी विविध देशांवर दबाव वाढवला असला तरी भारताने स्वतंत्र ऊर्जा धोरण कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.