वाशीम,
free-modern-artificial-modular-legs : गेल इंडीया लिमिटेड यांच्या सीएसआर सहाय्यता अंतर्गत व भारत विकास परिषदेच्या दिव्यांग केंद्र पुणे यांच्या वतीने आणि श्री चिंतामणेश्व मठ संस्था, वीरशैव लिंगायत समाज वाशिम जिल्हा यासोबतच आमदार श्याम खोडे यांच्या सहयोगातून स्थानिक स्वागत लॉन येथे येत्या १४ जून रोजी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये ३५० दिव्यांगांना मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय बसवून देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच फोनव्दारे पुर्वनोंदणी आवश्यक असून, या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी घेण्याचे आवाहन दिव्यांग केंद्राचे प्रमुख विनय खटावकर यांनी पत्रपरिषदेतुन केले.

मंगळवार, १९ मे रोजी स्थानिक विश्रामगृहात झालेल्या पत्रपरिषदेत आमदार श्याम खोडे, गेल इंडीयाचे संचालक प्रा.डॉ. रविकांत कोल्हे, मोहन बोरगांवकर आदींची उपस्थिती होती. विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर पुणे यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १३ दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या २५ वर्षापासून अखंड कार्यरत आहे. भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबीर घेणार्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात. तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रा.स्व. संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एप्रिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. गेल इंडिया लि. यांच्या सी.एस.आर निधीतून गेली दोन वर्षे मोफत दिव्यांग शिबिरे अमरावती व अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. असेच मोफत दिव्यांग शिबिर या वर्षी सुद्धा वाशीम येथे घेण्यात येत असल्याची माहिती खटावकर यांनी दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची बाजारात रु. ५० हजारापेक्षा जास्त किंमत असून असे कृत्रिम पाय ह्या शिबिरात ३५० दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपूर फूटपेक्षा हे आधुनिक मॉड्यूलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जात असल्याची माहिती खटावकर यांनी दिली. जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार श्याम खोडे यांनी केले. चिंतामणेश्वर मठ संस्थान व वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते काशिनाथ लाहोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. पत्रपरिषदेला प्रिंट, इलेट्रॉनिक मिडीयाचे बहूसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.