नागपूर,
Water Conservation Workshop दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), नागपूर केंद्र, नागपूर जलप्रेमी जलदूत समूह आणि जलयोद्धा डॉ. प्रवीण डबली यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी रोड येथील संस्थेच्या परिसरात जलसंवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हाभरातून सुमारे १२० जलदूत, सरपंच व ग्राम सचिवांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेत नदी, नाले आणि विहिरींचे खोलीकरण तसेच पुनर्जीवन करून जलसंवर्धनावर भर देण्यात आला. यावेळी तालुका व गाव पातळीवरील जलस्रोतांची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. तलाव खोलीकरण व विहीर पुनर्जीवन जनसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनात पद्मश्री उमाशंकर पांडे यांनी पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असल्याचे सांगत पारंपरिक जलस्रोतांचे जतन करण्याचे आवाहन केले. आधुनिक जीवनशैलीमुळे विहिरी व तलाव दुर्लक्षित होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि प्रत्येक थेंब पावसाचे पाणी जतन करण्याचे आवाहन केले. Water Conservation Workshop कार्यशाळेत पद्मश्री सेठपाल सिंह, डॉ. संदीप शिरखेडकर, डॉ. प्रवीण डबली यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला नागपूर व वर्धा परिसरातील जलदूतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र