मुंबई,
Water scarcity in 15 districts राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. सध्या राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक असून ६३३ गावांतील आणि १६५२ वाड्यांतील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण ७०६ टँकर या कामासाठी कार्यरत असून त्यामध्ये ३३ शासकीय आणि ६६९ खासगी टँकरचा समावेश आहे.उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ठाणे विभागात १७७ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत, तर पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांना १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ताण असून येथे १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी २४४ टँकर कार्यरत आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नागपूर विभागात सध्या टँकरची आवश्यकता नाही
नागपूर विभागात सध्या कोणत्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी टँकर पुरवठ्यासह पर्यायी जलस्रोतांचा वापर, विहिरींचे अधिग्रहण आणि जलसाठ्यांचे नियोजन केले जात आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन टंचाईग्रस्त भागांमध्ये अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.