1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ
चंद्रपूर,
सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना आणि तीही पहिली Digital census डिजीटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना केली.
Digital census यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना संबंधित संकेतस्थळावर स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल ओटीपीने लॉगिन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावयाची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळसोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून, आपण मराठीतसुध्दा माहिती भरू शकतो. माहिती भरून सबमीट केल्यानंतर एस.ई. आयडी क्रमांक येतो. तो क्रमांक 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकांना दाखवायचा आहे. भरलेली माहिती ही 100 टक्के गोपनीय आहे.
नागरिकांनी स्वयंगणना करावीः डॉ. अशोक उईके
स्वयंगणना केल्यानंतर डॉ. उईके म्हणाले, मी स्वत: महाराष्ट्र दिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वयंगणना केली आहे. 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या कालावधीत स्वयंगणना करावी आणि या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.