गोंदिया जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत मुलींचा डंका

    दिनांक :02-May-2026
Total Views |
- जिल्ह्याचा निकाल ८९.५९ टक्के : अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्यात टॉपवर

गोंदिया,
12th class exam results in Gondia district महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८९.५९ टक्के लागला असून, या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. त्यांच्या निकालाची टक्केवारी ९३.७२ इतकी, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ इतकी आहे. विशेष म्हणजे, या निकालात ९४.०९ टक्के घेत अर्जुनी मोरगाव जिल्ह्यात टॉपवर आहे.
 
 

muli
 
इयत्ता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनादेखील होती. अखेर शिक्षण मंडळाने शनिवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करत त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. गतवर्षीची परंपरा कायम राखत मुली यंदाही टक्केवारीत समोर आहेत. जिल्ह्याचा निकाल पाहता जिल्ह्यात एकूण १८ हजार १६१ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. यात ९ हजार ४२१ मुली, तर ८ हजार ७४० मुलींचा समावेश होता. तर ९ हजार ३६७ मुले व ८ हजार ६९६ मुली अशा एकूण १८ हजार ६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तथापि, ८ हजार ३४ मुले व ८ हजार १५० मुली असे एकूण १६ हजार १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात टक्केवारीनुसार जिल्ह्याचा निकाल ८९.५९ टक्के इतका आहे. यातच मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ इतकी असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.७२ इतकी आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलीच समोर राहिल्या असून अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्यात टाॅप ठरला आहे, या तालुक्याचा एकूण निकाल ९४.०९ टक्के आहे, तर आमगाव तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजेच ७९.८० टक्के इतका निकाल आहे.
 
अर्जुनी मोरगावच्या सरस्वती महाविद्यालयाचे यश...
12th class exam results in Gondia district  अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल (विज्ञान शाखा) १०० टक्के लागला असून जान्हवी नरेश चिचमलकर ९५.१७ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत जिल्ह्यातून प्रथम तर निधी पद्माकर कोरे ९४.५० टक्के गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय व सुयश हेमराज बोरकर ९२.८३ टक्के जिल्ह्यातून तृतीय ठरल्याचे संबंधित विद्यालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तर याच महाविद्यालयातील अनुराग बोरकर हा कला शाखेतून जिल्ह्यातून द्वितीय आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
तालुकानिहाय निकाल... (आकडे टक्केवारीत)
गोंदिया ः ९१.२३
..............................
आमगाव ः ७९.८०
..............................
अर्जुनी मोरगाव ः ९४.०९
................................
देवरी ः ८९.६१
..............................
गोरेगाव ः ८१.२७
......................................
सडक अर्जुनी ः ९०.६३
......................................
सालेकसा ः ९१.२६
................................................
तिरोडा ः ९१.११
................................................