अमरावती विभाग विदर्भात अव्वल, राज्यात तिसरा

बुलढाणा जिल्हा विभागात प्रथम उत्तीर्णतेत यंदाही मुलीच वरचढ

    दिनांक :02-May-2026
Total Views |
अमरावती,
12th result amravati इयत्ता बारावीच्या निकालात अमरावती विभाग ९०.९२ टक्के निकालासह राज्यात तिसरा तर विदर्भात पहिल्या स्थानावर राहीला आहे. विभागातून बुलढाणा जिल्हा अव्वल स्थानी असून विभागात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्तच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.५१ टक्क्यांनी निकालात घसरला आहे.
 
 
 
12th result amravati
 
 
अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ लाख ३४ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ६९ हजार ६७१ मुलांची तर ६४ हजार ६८१ मुलींची संख्या आहे. अनुक्रमे ८८.२९ व ९३.९५ अशी त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ९५.२२ टक्के निकाल बुलढाणा जिल्ह्याचा लागला असून ९१.१५ टक्क्यांसह वाशीम जिल्हा दुसर्‍या, ९०.१४ टक्क्यांसह अकोला जिल्हा तिसर्‍या, यवतमाळ जिल्हा ८९.६९ टक्क्यांसह चौथ्या तर अमरावती जिल्हा ८८.२६ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर राहीला आहे.12th result amravati यंदाचा अमरावती विभागाचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.५१ टक्क्यांनी घसरला असून गेल्यावेळेस विभागाचा निकाल ९१.४३ टक्के लागला होता. यंदा विभागातले १९ हजार ६४६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ४० हजार १६२, द्वितीय श्रेणीत ५६ हजार २७२ तर १८ हजार २७२ विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेचे ९७.४८, कला शाखेचे ८१.३३, वाणिज्य शाखेचे ८९.८७, व्यवसाय अभ्यासक्रमाचे (एएससी व्होकेशनल) ७५.८७, तांत्रिक विज्ञान शाखेचे ९०.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जे विद्यार्थी अनुर्त्तीण झाले किंवा ज्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 
जिल्हा निहाय टक्केवारी
जिल्हा     २०२२    २०२३    २०२४    २०२५    २०२६
बुलढाणा  ९७.३१   ९३.६९  ९१.७८   ९५.१८   ९५.२२
वाशीम    ९७.२१   ९५.४५   ९५.६९  ९५.६६  ९१.१५
अकोला   ९५.८४   ९३.११    ९३.३७  ८४.२८   ९०.१४
यवतमाळ ९५.१३   ९१.९८   ९३.०५   ९०.६३   ८९.६९
अमरावती ९६.४१   ९०.७८   ९२.३३   ९१.०५   ८८.२६