मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला
अंजनगाव सुर्जी,
accident मित्राच्या लग्नाला जात असताना दोन तरुणांवर काळाने झडप घातली. भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना ३० एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे अंजनगाव सुर्जी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नांदूरकर (वय २९) आणि शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८, रा. झाडीपुरा सुर्जी) हे दोघे मित्राच्या लग्नासाठी जालना येथे जात होते. दरम्यान, मेहकर ते सिंदखेडराजा दरम्यानच्या हायवेवर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
accident या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दोघेही अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असून, त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मृतांपैकी एक तरुण इंजिनिअर होता, तर दुसर्याचे केवळ वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. आनंदाच्या क्षणी निघालेल्या या प्रवासाचा शेवट दु:खद ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मित्राच्या लग्नाला जाणे जीवावर बेतले, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.