परिस्थिती बदलल्याने शिवसेनेत : बच्चू कडू

    दिनांक :02-May-2026
Total Views |
अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागत
 
अमरावती, 
Bachchu Kadu प्रहारमधून शिवसेनेत प्रवेश घेणार्‍या बच्चू कडू यांचे आज पहिल्यांदा अमरावतीमध्ये आगमन झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. परिस्थिती बदलल्याने आपण शिवसेनेत गेलो आहे. मात्र वंचित, शेतकरी व कष्टकर्‍यांसाठी शेवटपर्यत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला. या निर्णयाने अनेकांना धक्का दिला. सध्या सर्वत्र चर्चा व प्रतिक्रिया उमटत असताना बच्चू कडू शनिवारी अमरावतीमध्ये पोहोचले. सकाळी त्यांनी बेलोरा गावी जावून त्यांच्या आई व वडीलांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची मोठी मिरवणूक देखील काढण्यात आली.
 
bachchuk
 
बच्चू कडू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच अध्यक्ष असल्याने त्यांनी बँकेत देखील भेट देवून चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, आपण शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. आपणास धर्माचा गर्व असला तरी त्यावरून वाद होवू देणार नाही. प्रत्येक धर्माच्या शेवटच्या माणसास ताकद देण्याचे काम आपण करणार आहे. भगवा झेंडा हा सर्वांचाच आहे. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, अब्दुल कलाम आझाद या विभूतींचा हा झेंडा आहे. मी सामान्यांसाठी लढणार आहे. वेळ पडल्यास सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर देखील उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Bachchu Kadu  आपण आजपर्यत मुंबई व दिल्लीचे गुलाम नव्हतो. परंतु, राजकीय समीकरण व परिस्थिती बदलली आहे. आपण आतापर्यत सामान्य माणसाचा गुलाम होतो. जात, धर्म, पैसा याच्या बळावर निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे आपली पक्ष प्रवेशाची मजबूरी नसली तरी परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सेवा हेच ब्रिद आहे. त्यांच्या विचारावर आपण चालणार आहे. शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग व सर्वसामान्यांसाठी आपली लढाई व संघर्ष सुरु राहणार आहे. अचलपुर मतदार संघातून निवडणूक लढणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता तो आपल्या हक्काचा मतदार संघ असून आपण नक्कीच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण भिती दाखविणारे नसून घाबरणारे देखील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.