अनिल कांबळे
नागपूर,
sua hotel froud ‘सुआ हाॅटेल्स’ या कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली आराेपींनी शहरातील एका डाॅक्टरला 29.77 लाखांचा गंडा घातला. हुडकेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुप्रिया वेंकट मेश्राम व आकाश राजेंद्र गजबे (साईराम अपार्टमेंट, जानकीनगर, मानेवाडा) अशी आराेपींची नावे आहेत. तक्रारदार डाॅ.निखील चंद्रकांत येवले (36, सच्चिदानंद नगर, मानेवाडा) यांना मागील वर्षी इन्स्टाग्रामवर बिझनेस नेटवर्कची जाहिरात दिसली. त्याच्या आधारे त्यांनी आराेपींना संपर्क केला. आराेपींनी ते सुआ हाॅटेल्स प्रा.लि. या कंपनीचे मालक असून त्यांची 100 टक्के संयुक्त मालकी असल्याचा दावा केला. त्यांची कंपनी पब, हाॅटेल्स, रेस्टाॅरेन्ट व बारचा व्यवसाय करते असेदेखील त्यांनी सांगितले. जर या कंपनीत गुंतवणूक केली तर जास्त ना हाेईल असे आमिष त्यांनी दाखविले. तसेच कंपनीचे 30 टक्के शेअर्सदेखील विकायचे आहेत असा दावा त्यांनी केला. त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरदेखील तशी माहिती टाकली हाेती. त्यांनी डाॅ.येवले यांच्याकडून 7 ऑगस्ट 2025 ते 29 एप्रिल या कालावधीत वेळाेवेळी 29.77 लाख रुपये घेतले. मात्र त्यांनी डाॅ.येवले यांना कुठलाही ना दिला नाही. तसेच त्यांनी मूळ रक्कमदेखील परत करण्यास टाळाटाळ केली.sua hotel froud आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डाॅ.येवले यांनी पाेलिसांत तक्रार केली. पाेलिसांनी सुप्रिया व आकाशविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
सुआ हाॅटेल नेहमीच चर्चेत
सदरमधील ‘सुआ’ बारमध्ये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात माेठे प्रकरण समाेर आले हाेते. आकाश व सुप्रिया हेच नाव असलेल्या दाेन आराेपींनी तेथील कर्मचाऱ्यांसाेबत मिळून डेटिंग अॅपच्या माध्यमातून मुलींकडून लुटमार करण्यासाठी सापळा रचला हाेता. त्यांच्यातील एका तरुणीने डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री करून तरुणाला बारमध्ये बाेलावले हाेते. त्यानंतर महागड्या मद्याची ऑर्डर देऊन अवाजवी बिल आकारण्यात आले आणि नंतर धमकावून पैसे वसूल करण्यात आले हाेते.