‘रेडिओअॅक्टिव्ह’ पदार्थ पसरवून हल्ला करण्याची धमकी
अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल: पत्र पाठवून दिली हाेती धमकी
दिनांक :02-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Case registered शहरातील धार्मिक स्थळे आणि महत्वाच्या ठिकाणांवर ‘रेडिओअॅक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याची धमकी देणारे पत्र पाेलिस आयुक्तांना मिळाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत पाेलिस आयुक्तांनी पत्राच्या आधारावर डीएसएस संघटनेवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सदर पाेलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या घडामाेडीत पत्रातल्या धमकीची गंभीर दखल घेत पाेलिस आयुक्तालयाच्या सुचनेवरून गुरुवारी तातडीने धमकीचा उल्लेख असलेल्या ठिकाणी श्वानपथक, न्याय वैद्यक सहाय्यक विभाग आणि बाॅम्ब शाेध पथकाने तपासणी केली. न्याय वैद्यकच्या टीमने रासायनिक विश्लेषकांच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण केले. पथकाने केलेल्या पाहणीत सुदैवाने काेणताही ‘रेडिओअॅक्टिव्ह’ पदार्थ अथवा घटक आढळला नाही.
पाेलिस आयुक्तालयाला 27 एप्रिलला मिळालेल्या निनावी पत्राद्वारे ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेने आक्षेपार्ह भाषेचा वापर करीत मेट्राे, संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर आदी ठिकाणी ‘सिझीयम-137’ हे ‘रेडिओअॅक्टिव्ह’ पावडर टाकले आहे. हे पावडर प्रचंड विनाशकारी असून त्यामुळे अनेकजण विकिरण संसर्ग बाधीत हाेतील अशी धमकी देण्यात आली. ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेने इंग्रजी भाषेत पाठवलेल्या या पत्रात ऑरेंज आणि अॅक्वा लाइनवरील मेट्राे गाड्या तसेच भाजपा-संघ कार्यालयाच्या मार्गावरील आपली बसमध्येदेखील ‘सिझीयम-137’ पावडर टाकल्याचा दावा केला. Case registered काही दिवासांपूर्वी दाेसर चाैक येथील डाॅ. उज्ज्वल लांजेवार यांच्या घरासमाेरील माेकळ्या जागेतून डिटाेनेटर्स व जिलेटिनच्या कांड्याही आम्हीच ठेवल्या हाेत्या व हा केवळ इशारा हाेता, असा दावा धमकीच्या पत्रातून केला आहे. या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे प्रभारी उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे साेपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून ते पत्र कुठून आले, याबाबत माहिती घेण्यासाठी पाेस्ट विभागाला पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे.