- आमगावात उमटला कृतज्ञतेचा स्वर
- सुपुत्र विजय शिवणकर यांचा शासनाच्या वतीने यथोचित सन्मान
आमगाव,
Former Minister. Late. Mahadevrao Shivankar गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करून या मातीला विकासाची नवी स्वप्ने देणारे जिल्ह्याचे शिल्पकार, माजी अर्थमंत्री कै. प्रा. महादेवराव शिवणकर (दादा) यांच्या दैदिप्यमान आणि त्यागी कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ मे रोजी जिल्हा स्थापना दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. शासनाच्या ‘ज्येष्ठ कार्यकर्ता सत्कार’ या विशेष उपक्रमांतर्गत दादांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या अतुलनीय कार्याप्रती कृतज्ञतेची फुले अर्पण करण्यात आली.
Former Minister. Late. Mahadevrao Shivankar गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीत धगधगता संघर्ष आणि दूरदृष्टीचा वाटा असलेले तत्कालीन पालकमंत्री तथा माजी पाटबंधारे व वित्तमंत्री कै. महादेवराव शिवणकर यांचे कार्य अवघ्या विदर्भासाठी आजही दिशादर्शक आहे. १ मे या जिल्हा स्थापना दिनाचे औचित्य साधून, राज्य शासनाने त्यांच्या स्मृतींना शासकीय वंदना दिली. यावेळी आमदार संजय पुराम, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, आमगावचे तहसीलदार नवनाथ काठवडे यांनी शिवणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आदरांजली वाहिली. मरणोत्तर करण्यात आलेल्या या विशेष गौरव सोहळ्यात दादांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी गोंदिया जिल्ह्याचा आज जो कायापालट दिसत आहे. त्यामागे दादांच्या संघर्षाची आणि लोकहिताच्या ध्यासाची मोठी तपश्चर्या आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला ’ज्येष्ठ कार्यकर्ता सत्कार हा उपक्रम केवळ औपचारिक सत्कार नसून, ज्या महापुरुषांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी खर्ची घातले, त्यांच्या योगदानाचे हे पुनस्मरण असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक क्षणी विजय शिवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे मनापासून आभार मानले. दादांचे कार्य आणि त्यांचे विचार नव्या पिढीसाठी सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहतील. हा सन्मान प्रत्येक शिवणकर प्रेमींचा आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.