समुद्रपूर,
groom on a bullock cart आजच्या आधुनिक आणि दिखाऊपणाकडे झुकणार्या विवाह सोहळ्यांच्या पृष्ठभूमीवर, पार्डी (चाकूर) येथील बुचके कुटुंबीयांनी साधेपणा आणि परंपरेचा सुंदर संगम घडवून एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला. मुलाच्या लग्नाची वरात थेट बैलबंडीवरून काढून शेतकरी स्वाभिमानाचा हृदयस्पर्शी संदेश दिला.
तालुक्यातील पार्डी (चाकूर) येथील प्रगतशील शेतकरी चिंधूजी बुचके यांचे सुपूत्र मंगेश यांचा विवाह सोहळा २९ एप्रिल रोजी कळंब येथील जया दीपक पांडे यांच्या कन्या दिव्या हिच्याशी अतिशय उत्साहात व पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. मुलाच्या लग्नाचा आनंद हा प्रत्येक वडिलांसाठी आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा असतो. हाच आनंद साजरा करताना त्यांनी दिखाव्यापेक्षा आपल्या मातीशी, संस्कृतिशी आणि शेतकरी ओळखीशी असलेले नाते अधिक जपले.
मंगेश बुचके यांच्या वरातीसाठी आकर्षक पद्धतीने बैलबंडी सजवण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात, गावकर्यांच्या उपस्थितीत ही वरात गावातून मार्गक्रमण करत असताना, जणू शेतकरी संस्कृतिचा साज चढलेला एक जिवंत देखावा साकारला गेला. बैलबंडीवर बसलेला वर आणि त्याच्या चेहर्यावरचा आनंद, तर बाजूला उभे असलेले आई-वडील यांच्या डोळ्यातील अभिमान हे दृश्य उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.
आम्ही शेतकरी आहोत, हीच आमची ओळख आणि हीच आमची शान, हा संदेश या अनोख्या वरातीतून उमटला. केवळ एक विवाह सोहळा न राहता, हा कार्यक्रम शेतकरी स्वाभिमानाचा जिवंत उत्सव ठरला.groom on a bullock cart या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, बुचके कुटुंबीयांनी समाजासमोर साधेपणा, परंपरा आणि स्वाभिमान यांचे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.