किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला

    दिनांक :02-May-2026
Total Views |
पाच जणांवर गुन्हे दाखल

उमरखेड, 
Knife attack case केवळ 200 रुपयांच्या किरकोळ व्यवहारातून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाल्याची घटना बुधवारी शहरालगत विटभट्टीवर संध्याकाळी 7 च्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार अर्जुन दिलीप काळबांडे (वय 35) वीटभट्टीचालक, महात्मा गांधी वार्ड, उमरखेड यांच्या विटभट्टीवर आरोपी शेख जायेद शेख जावेद हा माती टाकण्याचे काम करत होता. यामध्ये 200 रुपयाचे देणे बाकी असल्याने 29 एप्रिल रोजी सकाळी त्याने पैसे मागितले. मात्र, त्यावेळी पैसे नसल्याचे सांगितल्याने दोघात वाद झाला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत ‘नंतर बघतो’ अशी धमकी देत निघून गेला.
 
 
Knife attack
 
Knife attack case  त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता शेख जावेद (20 वर्षे) याच्यासह त्याचे चार सोबत्यासह शेख शहीद शेख जावेद (20 वर्षे), शेख शोयब शेख रुस्तुम (23 वर्षे), शेख रेहान शेख रफिक (24 वर्षे) व शेख सिद्दीक शेख खलील (23 वर्षे) हे लाकडी दांडके व चाकू घेऊन विटभट्टीवर आले. त्यांनी अर्जुन काळबांडे यांना घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेख शोयबने चाकूने जीवघेणा हल्ला करत उजव्या मांडीत वार केला. जखमी अवस्थेत काळबांडे यांनी आरडाओरड केल्याने आसपासचे कामगार धावत आल्यामुळे मारेकरी आरोपी पसार झाले. कामगारांनी तत्काळ जखमीला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. पाचही आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंढे करीत आहेत.